संविधान भवन बांधण्यास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंजुरी

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नॉर्थकोट हायस्कूल येथील एक एकर जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी मंजुरी दिली. नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या संविधान भवन उभारणीच्या कामाला परवानगी मिळण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी झाली असून आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुरावाल्या यश आले आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागीलबाजूस असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा येथील सुमारे एक एकर जागा सोलापूर महानगरपालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु ही जागा संविधान भवन बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अखत्यारीतील इतर जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जागा हस्तांतरित केल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जून २०२३ रोजी च्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारीतील ही जागा संविधान भवनाकरिता देणे उचित होणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. तसा शेरादेखील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर मारला होता.
यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे या नियमात सूट देऊन संविधान भवन बांधण्याकरिता परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे याबाबत आग्रह धरला होता. शासन निर्णयामधील अनुक्रमांक सहा, सात आणि नऊ हे नियम अटीमध्ये अंशत: बदल करून या नियमांना शिथिल करून त्याच जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती. कौशल्य, विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सोलापूर दौरा वेळी झालेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन मंत्री श्री. लोढा यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले होते. यानंतर कौशल्य, विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संविधान भवन बांधकामास मंजुरी देत सोलापुरातील भीमप्रेमींना दिलासा दिला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा निर्णय
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधान भवन बांधण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कौशल्य, विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंजुरी देण्याचा निर्णय हा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा निर्णय आहे. या निर्णयाकरिता कौशल्य, विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आणि संविधान भवनच्या उभारण्याच्या परवानगीसाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही सोलापुरातील तमाम भीमप्रेमींच्यावतीने आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य