पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिम शिवमय वातावरणात संपन्न

सोलापूर – हिंदवी परिवाराची पन्हाळा पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहिम 18, 19 आणि 20 जुलै दरम्यान शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमय वातावरणात पार पडली.
मोहिमेची सुरुवात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवचा जय जयकार करत या जयघोषात वीर बाजीप्रभू देशपांडेंच्या विरतेच्या घोषणा देत नरवीर शिवा काशीद आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली.
मसाई पठार येथे पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक घटनेचा पूर्वार्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या वाणीतून सर्व शिवभक्तांना ऐकायला मिळाले.
यंदाच्या पावसाळी पदभ्रमंती मोहिमेत महाराष्ट्रातून जवळपास 550 शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साधारण 150 शिवभक्त होते.
सोलापूर, पंढरपूर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, वाशिम, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, बुलढाणा, नाशिक, ठाणे, बीड यांसह राज्यभरातील अनेक शिवभक्त सहभागी झाले होते.
तीन दिवसांच्या कालावधीमध्ये 54 किमी अंतर पार करायचे होते. त्यामध्ये पहिला मुक्काम खोतवाडी येथे तर दुसरा मुक्काम पांढरेपाणी या गावी होता. या प्रवासात डोंगर, जंगले, गुंठा अर्धा गुंठ्याच्या शेती आणि त्यामध्ये प्रामाणिकपणे घाम गाळणारे शेतकरी बांधव, वाड्या वस्त्यांवरील शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या बोलण्यात दिसणारा प्रामाणिकपणा म्हणजे शिवाजी महाराजांचा प्रामाणिक काळ या मातीत आजही दिसत होता. एकूणच मोहिमेचा संपूर्ण अनुभवच विलक्षण होता. असे सहभागी शिवभक्तांनी सांगितले.
राष्ट्रप्रथम वंदेमातरम् ह्या ब्रीदवाक्यावर परिवाराची वाटचाल असते. या मोहिमेच्या माध्यमातून शिवविचारांची आठवण होऊन युवक व्यसनमुक्त व्हावेत, तसेच राष्ट्र बांधणीचे कार्य करण्यासाठी प्रेरित व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. मोहिमेचा उत्तरार्ध पावनखिंड येथे डॉ. शिवरत्न शेटे सरांनी सांगितला आणि मोहिमेची सांगता झाली.
या मोहिमेत राज्यमंत्री बच्चू कडू, आयुष्मान भारत मिशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे परिवारासह सहभागी झाले होते.
याप्रसंगी डॉ. सुप्रज्ञा शेटे, मोहिम सरनोबत संभाजी भोसले, महेश शिंदे, धारेश्वर तोडकरी, अर्चना शिंदे, सोमनाथ शिंदे, तुषार आवताडे, भूषण बापट, दिलीप मेसरे, विजय पोखरकर, ऍड.महेश जगताप, परशुराम कोकणे, शंभू लेंगरे, समाधान आवताडे,नितीन सुकरे,सचिन भोसले, दादू कांबळे, संतोष शेटे, अजय भोयर यांनी मोहिम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
पावनखिंड…मराठ्यांच्या रक्ताने माखलेल्या…बाजीच्या हौतात्म्याने पावन झालेल्या पावनखिंडीतील मातीने कपाळावर टिळा लावुन, माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत हिंदवी परिवार सोलापूर जिल्हाप्रमुख म्हणुन सोमनाथ शिंदे यांची तर शहरप्रमुख म्हणुन तुषार आवताडे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवरत्न शेटे यांनी केली.