crossorigin="anonymous"> मसरे परिवाराच्यावतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात – Swarajya News Marathi

मसरे परिवाराच्यावतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात

0
मसरे परिवाराच्यावतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात

सोलापूर- येथील कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवनिमित्त अष्टमी दिवशी मसरे परिवाराच्यावतीने आई राजा उदेऽऽ उद्देऽऽ चा गजर करीत दहीहंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

मंगळवारी, उत्तर कसबा येथील मसरे यांच्या निवासस्थानापासून मंगलमय वातावरणात ही मिरवणूक निघाली. यावेळी ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिध्देश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, राजशेखर चडचणकर, सकलेश विभूते, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

ठिकठिकाणी भाविक भक्तिभावाने अभिषेकासाठी दही-दूध देत होते. गवळी समाजबांधव दहीहंडी डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक मसरे गल्ली येथून पुढे टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, बलिदान चौक, रूपाभवानी चौकमार्गे वाजत गाजत श्री रुपाभवानी मंदिरात आली. या ठिकाणी देवीला विधिवत दही-दुधाचा अभिषेक करण्यात आला.

या मिरवणुकीदरम्यान आई राजा उदे ऽऽ उद्देऽऽ चा गजर करीत देवीच्या नावाचा जयजयकार करण्यात येत होता. तसेच रात्री महापूजेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतदेखील भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!