आ. देवेंद्र कोठे यांच्या वाढदिनी स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी दिले ३ लाख ५५ हजार रुपये

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी ३ लाख ५५ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच सुमारे २ लाख रुपयांच्या शेकडो किलो धान्याचीही देणगी स्वरूपात दिले आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांचे काका माजी महापौर महेश कोठे यांचे नुकतेच जानेवारी महिन्यात निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केला होता. तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार न करता त्या ऐवजी स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला नागरिकांनी देणगी द्यावी किंवा धान्य स्वरूपात सहाय्य करावे, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सोलापूरकरांनी ३ लाख ५५ हजार रुपयांची देणगी जमा केली आहे. तसेच १ हजार ८६५ किलो तांदूळ, २०१ किलो गहू, २५३ किलो तूर डाळ, ९१ किलो साखर, १२ किलो ज्वारी, ७ किलो लाडू, चार खानी स्टील डबे ५० नग, २० किलो शेंगा असे सुमारे २ लाख रुपये किंमतीचे धान्यही देणगी स्वरूपात दिले आहे.
विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे हे गेल्या ४ वर्षांपासून लोकवर्गणीतून जमा झालेल्या रोख रक्कम आणि धान्याइतकी रक्कम आणि धान्य चिरंजीव श्रीविष्णुराज आणि कन्या कवीश्री यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्वतःकडून स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी देणगी देतात. यंदाच्यावर्षीही अशाच पद्धतीने देणगी देण्यात येणार असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून २०१९ पासून आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून वर्षातील ३६५ दिवस दररोज १०० निराधार गरजवंतांना दोन वेळ पुरेल असा ३ चपाती, भाजी, भात अशा पदार्थांचा समावेश असलेला जेवणाचा डबा घरपोच देण्यात येतो. या योजनेला अनेक सोलापूरकरांनी यापूर्वी मदत केली आहे. आजवर या योजनेतून २ लाख २२ हजारपेक्षा अधिक डबे गरजूंना देण्यात आले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
गरजूंची क्षुधाशांती यातच आत्मिक समाधान
समाजातील गरजूंची पोटाची भूक भागवून त्यांना क्षुधाशांती मिळणे यातच मला आत्मिक समाधान लाभते. त्यामुळे नागरिकांना स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत सोलापूरकरांनी दिलेल्या सहकार्यरुपी शुभेच्छांबद्दल आभारी आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य