भारतीय ज्ञान परंपरा समजून घेणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ हेतू

सोलापूर : अनादी कालापासून चालत आलेली भारतीय ज्ञानपरंपरा विद्यार्थ्यांनी समजून घेणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा मूळ हेतू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेतर्फे गुरुवारी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात संवाद साधला.
याप्रसंगी व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा, प्रशासक डॉ. व्ही. पी. उबाळे, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजयकुमार जाधव, डी.पी.बी. दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी उपस्थित होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्यार्थ प्रकाश ग्रंथ, नॅपकिन बुके, शाल, पुष्पहार देऊन दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, इ.स. १२ व्या शतकात स्थापन झालेले ऑक्सफर्ड हे जगातील पहिले विद्यापीठ असल्याचे आपल्याला सांगितले जाते. परंतु त्याच्या ८०० वर्षांपूर्वी भारतात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध असून या परंपरेत पारंपारिक शिक्षणाबरोबरच संगीत, क्रीडा, योगासन, कौशल्य विकास आदींचा समावेश आहे. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी एआय, संगणक, तंत्रज्ञान यांच्यासोबतच योग, कौशल्य विकासही आत्मसात करावा असा हेतू बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नव्या पिढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. या धोरण अंतर्गत देशभरात ४२ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट अकाउंट तयार झाले असून शिक्षणाबरोबरच गायन, अभिनय, संगीत, कौशल्य विकास आणि इतर नाविन्यपूर्ण शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या क्रेडिट अकाउंटमध्ये क्रेडिट जमा होणार आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील काळातील शिक्षणासाठी होणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा म्हणाले, भारतातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी दयानंद शिक्षण संस्थेचे योगदान निश्चित असेल, असेही चोप्रा यांनी सांगितले.
डॉ. व्ही. पी. उबाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रेवा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.
———-
चौकट
दयानंद महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दरमहा मिळणार २ हजार रुपये
दयानंद शिक्षण संस्थेतील २०० विद्यार्थिनी आणि १०० विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेत अंतर्गत २ हजार रुपये देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या योजनेतून विद्यार्थी – विद्यार्थिनींना ग्रंथालय, प्रयोगशाळा, महाविद्यालय परिसर, रुग्णालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणी दिवसातील दोन तास महाविद्यालयाने नेमून दिलेले काम करायचे आहे. यासाठी दरमहा ६ लाख रुपये दयानंद शिक्षण संस्थेला देण्यात येणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा करताच दयानंद शिक्षण संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून या घोषणेचे स्वागत केले.