क्रांतिकारी सहकाऱ्यांना अखेरचा लाल सलाम! सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

सोलापूर – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे जेष्ठ नेते कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी आणि डॉ. प्रा. कॉ. सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दत्त नगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेची सुरुवात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व पुष्पांजली वाहून करण्यात आली. प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी क्रांतिकारी गीतातून लाल सलाम अर्पण केला.
कॉ. नरसय्या आडम मास्तर यांची भावनिक श्रद्धांजली
आपल्या श्रद्धांजलीत कॉ. नरसय्या आडम मास्तर म्हणाले : “माझी आणि कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी यांची पहिली भेट १९७८ च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाली. त्यानंतर ते माझ्यासोबत पक्षात सक्रिय झाले. ग्रामीण भागात अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून पक्ष पोहोचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. कामगार आणि शेतकऱ्यांची मजबूत मोट बांधण्यात ते पटाईत होते. अनेक गनिमीकाव्यांद्वारे त्यांनी आंदोलनांची धग पेटवली आणि शासन–प्रशासनाची धांदल उडवली. पहाडी आवाज आणि मार्क्सवादावरची ठाम पकड असणारा हा माझा सहकारी आज आपल्यात नाही, हे दुःख मनाला अतोनात वेदना देणारे आहे.
मात्र त्यांची विचारधारा ही मशाल सदैव तेवत राहील. त्यांच्या उणीवेची भरपाई करण्यासाठी तरुणांनी आता क्रांतिकारी कार्याला नवी गती द्यावी लागेल. जनआंदोलन जिवंत ठेवणे, हीच कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
या श्रद्धांजली सभेत नसीमा शेख, दत्ता चव्हाण, प्रवीण मस्तूद, चेतन नरोटे, प्रा. अजय दासरी, कॉ. रा. गो. म्हेत्रस, व्यंकटेश कोंगारी, आसिफ नदाफ, सुभाष बावकर, अशोक इंदापुरे, प्रदीप जोशी, यशवंत फडतरे, नागनाथ कलशेट्टी आदींनी सहभाग घेतला.
नेत्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की – “आजच्या गढूळ राजकीय परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्ते मिळणे कठीण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्ष मजबूत राखण्याचे अभूतपूर्व क्रांतिकारी कार्य कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी यांनी केले. अशा लढाऊ कॉम्रेडस सलामच करावा लागेल.”
पक्षाचे जिल्हा सचिव कॉ युसुफ शेख मेजर म्हणाले : “आम्ही एक ज्येष्ठ आणि आदर्श नेता गमावला आहे. हे दुःख पचविणे कठीण आहे. मात्र, त्यांची प्रेरणा कायम क्रांतिकारी कार्याकडे घेऊन जाणारी दिशा देणारी आहे. ही खुणगाठ प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.”
प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव कॉ युसुफ शेख मेजर यांनी तर सभेचे सूत्रसंचालन कॉ. अनिल वासम यांनी केले.