डीजे बंदीच्या आदेशा विरोधात कोर्टात दावा दाखल

सोलापूर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी हिंदूंचे आराध्य दैवत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी डीजे डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेजर व बीम लाईट लावण्यावर घातलेल्या बंदीविरोधात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार यांनी स्वतःच सोलापूर जिल्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्याची सुनावणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्यायाधीश एस. एस. वनकोरे मॅडम यांच्या कोर्टात झाली. सुनावणी दरम्यान ॲड. योगेश पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस काढून त्या नोटीसची तातडीने बजावणी करण्याचे आदेश दिले. त्याची पुढील सुनावणी दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
ॲड. योगेश पवार यांनी दाखल केलेल्या दाव्यात असे नमूद केले आहे की.., सोलापूर शहर व जिल्ह्यात वर्षभर विविध जयंती, उत्सव व धार्मिक मिरवणुका आयोजित केल्या जातात आणि त्या मिरवणुकांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डीजे व लेजर लाईटचा वापर केला जातो.
ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियमांनुसार सरसकट बंदी घालण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही. नियमानुसार ठरविलेल्या मर्यादेत व निर्धारित वेळेत ध्वनी व प्रकाशयंत्रणा वापरणे कायदेशीर आहे.
तसेच जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत सुमारे 300 हून अधिक मंडळांनी डीजे लावले, त्यापैकी केवळ 5-6 मंडळांवरच ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली डीजे, डॉल्बी व लेजर लाईटवरील सरसकट बंदी ही कायद्याच्या व घटनेच्या अधिकारात बसणारी नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी काढलेला बंदीचा आदेश तात्काळ स्थगित करावा आणि गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डीजे डॉल्बी व लेजर लाईटचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ॲड. योगेश पवार यांनी सदरच्या दाव्यात केली आहे.