शेतकऱ्यांना त्रास देवू नका अन्यथा… बँकांना मनसेचा इशारा

सोलापूर – पूरग्रस्त शेतकऱ्यांना हप्ता वसुलीसाठी आत्ता तरी त्रास देऊ नका अन्यथा हात जोडून नाहीतर मनसे स्टाईलने तुम्हाला भोगावे लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सर्व बँकांना हा इशारा देण्यात आला आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे.पूर बाधित उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मनसेच्या वतीने खते, बियाणे आणि शेतीपिकांच्या औषधांचे वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून खरंच ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असल्याचं मत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला. पूरग्रस्त शेतकऱ्यांना किमान 30 ते 40 हजार कोटींचे मदतीचे पॅकेज अमित शहा जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र ती आशा पूर्ण फेल ठरली आहे. शेतकऱ्यांच्या या पूर समस्येबाबत लवकरच मनसे नेते राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटतील तशी त्यांना मनसे पदाधिकारी मागणी करणार असल्याची माहिती मनोज चव्हाण यांनी दिली.