महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट महत्त्वाचे : उमेश पाटील

सोलापूर : महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या राजमाता लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोशन मंगल कार्यालय, कामती येथे उत्साहात पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांनी महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत बचत गटांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित करण्याचे आवाहन केले.
सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वार्षिक अहवाल सादर केला. गेल्या वर्षभरातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यात महिलांच्या उद्योजकता विकास, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश होता.सभेला संस्थेच्या सदस्य महिलांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेश पाटील यांनी आपल्या भाषणात बचत गटांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. ते म्हणाले बचत गट हे फक्त पैसे मिळवण्याचे साधन म्हणून पाहू नका. हे समाज सुशिक्षित करण्याचे प्रभावी साधन आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तर त्यांच्यात निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित होतात. ज्या घरात महिलांना निर्णायक क्षमता असते, ते घर कधीही प्रगतीपासून दूर राहत नाही. महिलांच्या मताचा आदर करणे हे निवडणुकीतील मतदानापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण घरातील निर्णय हे समाजाच्या पायाभूत विकासाचे आधार असतात.
पाटील यांनी महिलांच्या मालमत्ता हक्कांवरही भाष्य केले. ते म्हणाले, आपल्या शेतीच्या सातबारा उताऱ्यात आणि राहत्या घराच्या नावावर महिलांचे नाव असावे. हे केवळ कागदोपत्री बदल नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणाची खरी सुरुवात आहे. असे केल्याने महिलांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळते आणि कुटुंबाची प्रगती वेगवान होते असे सांगितले
या कार्यक्रमासाठी सिद्धाराम माशाळे, मन्सूर पटेल,रणजीत शेंडे,प्रशांत गायकवाड,योगेश बोडके,राजशेखर सासणे,संगीता नामदारे,अण्णासाहेब पाटील,रूपाली ननवरे,राणी सरवळे,छाया देठे,उर्मिला होनमाने,डॉक्टर कुसुम मॅडम,योगेश शिरसाट यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या