सोलापूर – पुणे स्थित सायडा (CYDA India) संस्था गेल्या महिन्यापासून पंजाब आणि जम्मू-काश्मीर राज्यांत पूरग्रस्त कुटुंबासाठी स्थानिक प्रशासनाच्या सहयोगाने सक्रीय मदतकार्य करीत आहे. महाराष्ट्रात आलेल्या पुराची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ‘सायडा इंडिया’ संस्थेने सोलापूर जिल्हा प्रशासन, स्थानिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काम सुरू केले आहे.
सोलापूरमधील दक्षिण आणि उत्तर भागातल्या सर्वात जास्त पूरग्रस्त प्रभावित एकूण २१ गावांपैकी १० गावांमध्ये ‘सायडा संस्था’ आणि ‘अस्तित्व संस्था ‘ यांच्या टीमने दौरा करून तिथल्या घरांचा, सरकारी संस्थांच्या नुकसानीचा अभ्यास केला आहे. त्याआधारे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये शमशापूर, वांगी आणि अकोले या गावांतील एकूण १२५ पूरग्रस्त कुटुंबांना मदत साहीत्याचे वाटप करण्यात आले. या साहीत्यात प्रत्येक कुटुंबाला शिधा; वैयक्तिक आरोग्यविषयक साहित्य तसेच घरगुती साहीत्याचा समावेश आहे. या वाटप कार्यक्रमात CYDA India चे विश्वस्त सदस्य आणि अस्तित्व संस्था चे अध्यक्ष शहाजी गडहिरे, तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक युवक उपस्थित होते.
सध्या अनेक पूरग्रस्त कुटुंबे शासनाने व्यवस्था केलेल्या निवारा केंद्रात राहत आहेत आणि पाऊस थांबल्याने ते आपल्या घराकडे परत जात आहेत. त्यांनी वेळेवर साहित्य मिळाल्याबद्दल त्यांनी CYDA India चे आभार मानले. मदत वितरणासोबत वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. एकूण ५३ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. त्यांना प्रामुख्याने सर्दी, ताप, अंगदुखी, त्वचारोग आणि अॅलर्जी अशा आजारांवर उपचार करण्यात आले.
सायडा आणि अस्तित्व टीमने केलेल्या गाव दौ-याची माहिती मोनिका सिंग, अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर आणि श्रीकांत पाटील, तहसीलदार, सर्वसाधारण विभाग, सोलापूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये दिली. बैठकीमध्ये पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिरे, आशावर्कर यांच्याकडे पुरेशी औषधे, गावात औषध फवारणी, गुरांसाठी चारा उपलब्धता, गुरांचे लसीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या विषयांवर चर्चा झाली.
चर्चेअंती, सायडा संस्थेने हाती घेतलेले हे मदतकार्य फक्त साहीत्य वाटपापुरते मर्यादित न राहता पूरग्रस्त कुटुंबांबरोबरीने सरकारी शाळा, अंगणवाड्या आणि दवाखाने यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोतोपरी मदत करेल. तर संस्थेला लागणारे सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासन अधिक-यांनी दिली.