आई प्रतिष्ठानतर्फे ५ हजार पूरग्रस्तांना पुरणपोळी, ग्रामस्थांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

सोलापूर : आई प्रतिष्ठानतर्फे ५ हजार पूरग्रस्तांना पुरणपोळीचे भोजन देण्यात आले. दक्षिण सोलापूर आणि मोहोळमधील एकूण ८ गावांमध्ये हा उपक्रम करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम केल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी सांगितले. या सेवाकार्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
यंदाच्यावर्षी झालेल्या प्रचंड मोठया पावसामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेकडो कुटुंबे उघड्यावर आली. परिणामी त्यांच्या दुःखाचा भार काहीसा कमी करण्यासाठी त्यांना पुरणपोळीचे भोजन देण्याची सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई प्रतिष्ठानला केली होती. त्यानुसार आई प्रतिष्ठानने मोहोळ तालुक्यातील शिंगोली, आष्टी, तरटगाव, शिरापूर, भोईरे, नरखेड, पोफळी, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, नंदूर, डोणगाव, समशापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील एकूण ५ हजार गावकऱ्यांना पुरण पोळीचे भोजन देण्यात आले.
यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, डॉ. बी. पी. रोंगे ,बी. डी. रोंगे, डॉ. करण पाटील, योगेश डांगरे, राहूल डांगरे, शुभम चिट्याल, अविनाश शंकू, समर्थ चिलवेरी, पवन श्रीराम हे या सेवा कार्यात सहभागी झाले होते.