समुदाय सहभागासाठी महिला आरोग्य समित्यांचे सक्षमीकरण आवश्यक

सोलापूर दि. 26 जुलै – सोलापूर महानगरपालिका, अनुसंधान ट्रस्ट- साथी (पुणे) व अस्तित्व संस्था (सांगोला) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 व 24 जुलै 2025 रोजी सोलापूर शहरातील जिजामाता व दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथे महिला आरोग्य समिती सदस्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत सोलापूर शहर आरोग्य कार्यक्रम अधिकारी तज्ञ डॉ.अरुंधती हराळकर, ३५ मासचे १५० पेक्षा जास्त समिती सदस्य, अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे, जिजामाता नागरी आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकारी डॉ.नीलोफर जेलर, दाराशा नागरी आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी डॉ.चौगुले आणि दोन्ही आरोफ्य केंद्रातील पीएचएन, आशा गटप्रवर्तक, सर्व स्टाफ यांचा सक्रीय सहभाग होता.
यावेळी सोलापूर शहर आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर म्हणाल्या, “महिला या समाजात नेहमीच महत्त्वाची कामगिरी पार पाडत आल्या आहेत. म्हणूनच महिला आरोग्य समिती गठीत करण्यात आली आहे. आरोग्य संदर्भातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठीची ही समिती आहे, समितीने सक्रीय झाल्यास वस्तीतील अनेक आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल.”
यावेळी महिला आरोग्य समितीच्या सदस्यांनी, “आमच्या वस्तीत प्रचंड घाण आहे. कचऱ्याची घंटागाडी लोकांच्या सोयीनुसार येत नाही. शौचालय, चेंबरची साफसफाई होत नाही. पावसाचे पाणी साठून मच्छर होवून आजारपणाचे प्रमाण वाढत आहे. वस्तीत दारूचा मोठा प्रश्न आहे. पिण्याचे पाणी गढूळ असते, पाण्यामध्ये अळ्या असतात. सरकारी दवाखान्यात आमच्या वस्तीतील लोकांना बीपी-शुगरच्या गोळ्या मिळाव्यात, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच ‘आम्ही दहाजणी दर महिन्याला मिटींग करतो पण आता आम्हाला कसं पुढं जायचं याचं मार्गदर्शन द्या. आम्ही वस्तीमध्ये बीपी-शुगर तपासणीचे शिबीर लावले. सरकारी दवाखान्यात जायला पाहिजे असं आम्ही लोकांना सांगतो. असे महिला आरोग्य समिती सदस्यांनी कामाचे अनुभवही सांगितले.
ही कार्यशाळा महिला आरोग्य समित्यांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रभावी पाऊल व प्रेरणादायी ठरली असून, यामुळे त्यांच्यात समुदायात आरोग्य विषयक सहभागाची जाणीव अधिक दृढ होईल, आणि समित्यांच्या माध्यमातून समुदायाचा आरोग्य सेवांमधील सहभाग अधिक भक्कम होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत महिला आरोग्य समितीचे महत्त्व व आरोग्य सेवांच्या सुधारणेतील भूमिका, वस्तीतील आरोग्य समस्या सोडवण्यात असणारा सहभाग, वस्तीतील आरोग्य प्रश्न सोडवण्याबाबत कृती कार्यक्रम व त्याचे नियोजनाबाबत साथी संस्थेच्या शकुंतला भालेराव यांनी, तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेबद्दल दिलीप हरमळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी वडणे यांनी केले. तर आयोजनात शहाजी गडहिरे, शकुंतला भालेराव, दिलीप हरमाळे यांचे मोलाचे योगदान होते.