कल्पकते द्वारे देखाव्याचे सादरीकरण ही खरी गणेशास दिलेली मानवंदना – एम. राजकुमार

सोलापूर – कल्पकतेद्वारे सादर करण्यात येणारे देखावे अर्थात आरासच्या माध्यमातून कलाकारांना गणेशोत्सव प्रसंगी लोकांसमोर देखावा माध्यमातून कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही खरी गणेशास दिलेली मानवंदना आहे. ६४ कलांचा अधिपती बुद्धीची देवता गणेशाची ही आराधना आहे. असे प्रतिपादन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी व्यक्त केले. श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समिती आयोजित “ढोलकपूर नगरी” या देखाव्याचे उदघाटन सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते फित कापून मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, राजशेखर हिरेहब्बू, केदार मेंगाणे, बाळासाहेब भोगडे, रामचंद्र जोशी, शिवानंद बुगडे, बिप्पीन धुम्मा, सुधीर थोबडे, उत्सव उपाध्यक्ष राहुल बुऱ्हाणपुरे, महेश हदरे, अभिजीत कुलकर्णी, पुष्कराज मेत्री, सिद्धेश्वर आळंद, नागनाथ मेंगाणे, आप्पासाहेब बिराजदार, नंदकुमार दर्गोपाटील, अमित गुंगे, कैलास मेंगाणे, आनंद मुस्तारे, जगदीश जम्मा, गुरुषांत मोकाशी, संदीप जोशी आदी मान्यवरांची उपस्थितीत होते.
बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समिती तर्फे गणेशोस्तव निमित्ताने दर वर्षी देखावा सादर करण्याची अखंडीत परंपरा आहे. त्यानुसार यंदा “ढोलकपूर नगरी” हा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्याद्वारे छोटा भीम, मोटू, ढोलू, पतलु, कालिया, चुटकी, यासह बाल गणेशाची वेगवेगळ्या आवेशातील पाळण्यात बसलेली मूर्ती सोबतीला गणेशाचे वाहन मूषक अर्थात उंदीर यासह विविध कलाकृतीचा रंगबेरंगी प्रकाश झोतद्वारे करण्यात आलेले सादरीकरण लहानग्यासह कला प्रेमी रसिका करिता एक अनोखी पर्वणी ठरेल, असा विश्वास उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांनी या वेळी व्यक्त केला.
उद्घाटना नंतर श्रींची पूजा व आरती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंडळाच्या वतीने त्यांचा सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा शाल, श्रीफळ, श्रीची प्रतिमा, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
उदघाटन प्रसंगी देखावा सादर करणारे कलाकार, विद्युत रोषणाई द्वारे सेवा पुरवणारे सत्यम पोरे, हलगी व बँड पथक द्वारे सेवा पुरवणारे आदींचा प्रमुख पाहुणे एम. राजकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रथम आणि अखंडीत रित्या देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा या पुढे ही चालू राहील असा आशावाद यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र चाटी तर आभार प्रदर्शन शशिकांत बिराजदार यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे सदस्य पदाधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.